दानधर्म – एक असामाजिक विष

अखेरीस भारताने दिलेला मदतीचा चेक पाकिस्तानने स्वीकारलाच. आर्थिक मदत कोणाला नको असते, आणि ती दानाच्या रुपात आली तर सोनेपे सुहागा कारण दान परत करायचे नसते ना. भारतीय राज्यकारात्यांनाहि दान केल्याचा आणि मदत केल्याचा मनोमन आनंद झाला. आपल्या सगळ्यांनाच होतो. दान केल्यावर आपण सामाज्यासाठी काहीतरी मदत करतोय यात आपण आपणहून खुश होतो. आपल दान आता एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी, किंवा जेवणासाठी, किंवा कोणाला काही व्यवसाय जमवण्यासाठी कमी लागणार आणि आपल्याला पुण्य मिळणार. आपण दिलेली भिक त्या सिग्नलवरच्या भिकाऱ्याला जेवण देणार त्याचे पुण्य आपल्याला मिळणार.

भिक, दानधर्म, आर्थिक मदत हे सगळे एकाच आर्थिक असमानतेचे प्रतिक आहेत ह्याचा विचार आपण कधीच त्यावेळी करत नाही कारण दान देताना आपले केविलवाणे मन त्या माणसाच्या किंवा संस्थेच्या मदतीत अडकले असते. आपले हे हळवे मन हि एक चांगली गोष्ट आहे पण त्यापाई आपण आर्थिक असमानतेचा मुद्दा बाजूला करतो असे नाही वाटत का?

खरे तर आपले हळवे मन ज्यावेळी आपण पैसे देतो किंवा चेक फाडतो त्यापुरते त्या समश्येशी जोडून असते. आपण पैसे दिल्यावर त्या भिकार्याचे उद्या काय झाले असेल ह्याचा आपण कधीच विचार करीत नाहीत. उद्या काय पुढच्या १० मिनिटात त्या भिकार्याने काय केले ह्याच्याशी आपले काहीच देणेघेणे नसते.

दान धर्म स्वीकारणाऱ्या एन.जी.ओ. ची पण तीच गत. आपण एन.जी.ओ. ला चेक देतो पण तो पैसा कुठे आणि कसा खर्च झाला ह्याचा कुणीच विचार करत नाहीत. गणपतीला वर्गणी मागायला येणाऱ्या मुलांसारखे ह्याची खातीही बरीच बिनहिशोबी किंवा दप्तरी खर्च जास्त दाखवणारी असतात. एन.जी.ओ. च्या जाहिराती, त्याची पत्रे, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी इत्यादी मध्ये बराच पैसा ह्या दप्तरी खात्यातच जातो. आयकर खात्याचा अहवाल वाचला तर समजून येईल कि तुम्ही दिलेल्या पैस्याच्या ६५ % पैसे हे दप्तरी खर्चात जातात आणि फक्त ३५ % खऱ्या कारणासाठी वापरले जातात. गणपती इत्यादी वर्गणीत हा आकडा ८५% – १५% इतका खाली येतो.

एन.जी.ओ. – बरेच एन.जी.ओ. त्याची मदत देताना काही अटी घालतात, त्यांचे बरेच पैसे उद्योगपती, राज्यकर्ते आणि धार्मिक संस्थांकडून आलेले असतात. उदारणार्थ क्याथालिक चर्च जेव्हा आफ्रिकेतील एखाद्या देशात दवाखाना काढते तेव्हा काही अटी घातल्या जातात, जसे – अबोर्शन करता येणार नाही, कोंडमचा वापर करू नये, एकच पत्नी असावी आणि येशूची प्रार्थना करावी. उद्योगपती त्या दवाखान्यात त्यांच्या कंपनीचे समान वापरण्याचीच अट घालतात. ते मोठे दानकर्ते असतात आणि त्याच्या अटी मान्य होतात आणि आपण छोटे दानकर्ते त्या चेकबरोबरच ती रक्कम विसरून जातो.

सरकार – ज्याक्षणी आपण दान करतो त्याच क्षणी सरकारवरच त्या समस्येला निस्तरायच दडपण कमी होते. आपण दिलेल्या दानामुळे सरकार अकार्यक्षम होत जाते ह्याची जाणीव कुणालाही होत नाही.

व्यवहार – खरे तर दान हा एक व्यवहारच आहे. दानामध्ये एकाच्या तोंडाचा घास दुसर्याच्या तोंडात भरवला जातो. श्रीमंत देश गरीब देशाला दिलेल्या दानामध्ये राजकीय आणि आर्थिक लाभ, स्वस्त बाजार आणि स्वस्त कामगार पाहत असतात.

गरिबी – अर्थशास्राचा अभ्यास आपणास दाखून देतो कि दानधर्म हा गरिबीच्या आर्थिक चक्राला अधिक गती देतो. दानधर्म कधीच गरिबी घालवत नाही तर त्याला पूरकच ठरतो. आजची सत्य परिस्थिती हीच आहे कि करोडो डॉलर हाती असूनही आफ्रिकेत कित्तेक मुले कुपोषणाने मरत आहेत आणि एन.जी.ओ. कितीही पैसे असून काहीच करू शकत नाही. गरिबी हि आपल्या आर्थिक साच्याचा एक घटक आहे आणि जीतपर्यंत श्रीमंती आहे तोपर्यंत गरीब असणारच. विषम आर्थिक समाज हे ह्यामागचे मूळ कारण आहे आणि दानधर्म हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही.

अपराध – आफ्रिकेत बरीच उदाहरणे दिसून येतील कि एन.जी.ओ. मदत वाटण्याकरिता गुंड, अपराधी आणि माफियांची मदत घेत असतात. त्यांच्यापुढे ह्या माफियान्शिवाय सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग नसतो. येणारी मदत लोकांपर्यंत पोहचवणारे दलाल हे माफियाच असतात आणि त्यांना जल्म देणारी खरी आई तो दानधर्म नाही का?

एक असामाजिक विष असणार दानधर्माचे हे क्रूर रूप जर आपण समजू शकलो तर त्यावर उपाय शोधायलाच हवा, काही उपाय जे मला योग्य वाटतात

उपाय –

१. कर – एन.जी.ओ., उद्योगपती, राजकीय नेते आणि धार्मिक संस्था हे दानधर्माचे खरे लोणी खातात आणि ते दानधर्म करतात कारण त्यांना करात सूट मिळते. दान धर्मावरील करात जर सूट रद्द केली तर बरेच मोठे दानकर्ते ह्यापासून परार्रुत्त होतील.

२. सामाजिक संस्था – एन.जी.ओ. आणि धार्मिक संस्था ह्यांना सामाजिक संस्था (उदारणार्थ – दवाखाने, शाळा इत्यादी) चालवण्याची परवानगी नसावी. जर त्यांना ह्या कामासाठी पैसे द्यायचे असतील तर ते सरकारी संस्थांनाच (सरकारचे आरोग्य आणि शिक्षण खाते) ह्यांना द्यावे. त्यामुळे ह्या संस्थानाच्या अटी त्या पैश्याबरोबर येणार नाहीत.

३. दप्तरी खर्च – एन.जी.ओ.ने जमा केलेल्या रकमेचा १००% रक्कम हि दानाच्या सामाश्येसाठी वापरली जावी, कुठलाही दप्तरी खर्च हा त्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचार्याचा वैयक्तिक खर्च असावा. एन.जी.ओ.त काम करणारे त्या कामाच्या आनंदासाठी आलले असावे, पगार घेण्यासाठी नाही.

ह्या सगळ्यात सरकारची भूमिका खूप महत्वाची आहे आणि ती त्याने निभावावी हे मी गृहीत धरले आहे. प्रत्येक नागरिकाने सरकला सामाजिक संस्थांबद्दल जाब विचाराने गरजेचे आहे.

मला अश्या जगात राहायला आवडेल जेथे दानधर्म, भिक काहीच नसेल. दान नसेल कारण आपण देऊ नये म्हणून नाही तर कोणाला गरज नाही म्हणून. किती चं जर असेल ते. कुठलीही नैसर्गिक आपदा आली तरी सरकार आणि नागरिक त्या अप्पातीतून कुठल्याही बाहेरील मदतीशिवाय सावरू शकतील आणि मग आपला समाज एक आदर्श समाज बनेल.

तुमच्या प्रतिक्रिया आणि उपायही वाचायला आवडतील – नयन